मनुस्मृती विरुद्ध संविधान?

२६ नोव्हेंबर १९४९ रोजी बाबासाहेबांनी या देशाला संविधान अर्पण केले होते. त्यामुळेच हा आजचा दिन संविधान दिन म्हणून पाळण्यात येतो. त्यानिमित्ताने काल कुटुंबीय आणि मित्रपरिवरासोबत काही विचार मांडले. तेच आज इथे व्यक्त करत आहे.

खात्रीपूर्वक सांगतो की तुम्ही हे शब्द मनुस्मृती आणि संविधान आधीही ऐकले असतील.
कदाचित गेल्या चार ते पाच वर्षात तर जवळ जवळ रोज एकदातरी कानावर पडले असतीलच.
तेवढ्याच खात्रीने सांगतो की इतक्या वर्षात ऐकूनही आपण दोन्हींमधील एकातही खोलवर जायचा प्रयत्न केला नसेल.
मि तुम्हाला दोष देणार नाही, मिसुद्धा आपल्यातील एक आहे.
मध्यंतरी संविधान वाचायला घेतलं तेव्हा काही अजून समजून घेणं मला महत्वाचं वाटलं. त्यात मनुस्मृती चा संदर्भ येणं स्वाभाविक होतं.
आता दोन क्षण थांबुन विचार करा की इतक्या वर्षात का गरज भासली नाही? करून बघा तर…

एक संभावना अशी असेल की संविधान खरंच एवढं महान आहे आणि तेच स्वतंत्र भारताच सर्वात मोठं यश आहे. बाकी जे काही देशाने कमावलं आणि साध्य केलं ते संविधानाच्या पायावरच.

माझ्या मते हे खरं आहे, तुमचे विचार वेगळे असू शकतात आणि त्यात काही गैर नाही.

पण जगात परिपूर्ण अस काहीच नसतं, असं समजुया की काही त्रुटी असतील ज्या त्याकाळात समजायच्या राहून गेल्या असतील.

किंवा कदाचित असंही असेल की इतक्या वर्षात ह्या दोन मनुस्मृती विरुद्ध संविधान टोकांच्या संघर्षाची झळ तुमच्या दारात आली नाही किंवा आधीच्या सामाजिक सलोख्याने (तोही सहज मिळवला नव्हता), पुरोगामी नेत्यांनी, समाजकारण्यानी आणि राजकारणी लोकांनी ती झळ समाजात खोलवर पसरु दिली नाही.

कदाचित आताही ही झळ तुमच्या जवळ नसेल आली आणि देव करो येऊ नये…

पण स्वतःला विचारा की तुम्हाला ही झळ पोचणार नाही ह्याची तरी खात्री देता येईल का तुम्हाला?

कारण सध्या आजूबाजूला एवढं जात पात, धर्म, मंदिर, मस्जिद, धर्मसंस्था आणि त्यांच्या ठेकेदारांनी पसरवलेले विष वाढत चाललं आहे की ह्याच्या विळख्यात आपण कधी फसून जाऊ हे कदाचित जाणीव पण होणार नाही. हे थोडं नकारात्मक वाटेल

पण शाळेत आणि शाळेबाहेर जे काही शिकलो त्यातला एक धडा कधीच विसरणार नाही “भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत…” अश्या माझ्या बांधवांशी माझे मतभेद असू शकतात पण मनभेद ठेऊ नयेत.

इथेच खरी संविधानाची खरी शिकवण आणि ताकद समोर येते. विविधतेने नटलेल्या ह्या देशात मनुवादी विचारांनी बऱ्याच अमानवीय रूढी आणि परंपरा लादल्या होत्या. त्यात भर ब्रिटिश लोकांनी त्याच विविधतेवर घाला घालून देशावर राज्य तर केलंच पण पुढील अनेक पिढ्या देश त्यांतच गुरफटत राहील ह्याची व्यवस्था करून गेले. बरं ते तर परकीय होते त्यांनी त्यांचा स्वार्थ बघितला. इथे आपल्याच धर्तीवर असेच विविधेतच्या मुलभूत पायावर घाला घालुन काही मोजकेच लोक संपन्न होत गेले आणि त्याचेच प्रयत्न वारंवार होतात. जरा नजर फिरवुन बघा कोण आहेत हे लोक, कुठुन येतात हे विचार?

उत्तर नाही मिळालं तर हा फक्त 12 मिनिटांचा ( https://youtu.be/t1Epmn_aZ0I ) BBC Hindi मजकुर ऐका आणि मग हाच प्रश्न परत स्वतःला विचारा कदाचित उत्तर मिळेल.
त्याच बरोबर संविधान किती सर्वोच्च महत्वाचं आहे हे पण जाणीव होईल. त्याचं रक्षण करणं हे तर त्याहून जास्त महत्वाचं काम आहे.

ह्यात कोण एका जात, उपजात, धर्म, पंथ, पक्ष किंवा संघटनेला दोषी मानणं पण चुकीचं ठरेल. देशाचं नशीब की इथे शाहू, फुले आणि आंबेडकर यासारखे थोर लोक जन्माला येऊन गेले, त्यांच्या कामाने निदान बऱ्याच जातीयवादी रूढी मोडीत निघाल्या आणि देश पुढे सरकला.

पक्ष्यांच्या बाबतीत बोलावं तर गेल्या काही दशकात कमी अधिक प्रमाणात सगळ्या प्रमुख पक्षांनी संविधानाची पायमल्ली केली आहे. त्यातले काही संविधान तळागाळातील लोकांपर्यंत पोचवण्यात आणि समाजवण्यात अपयशी ठरले आणि त्यातले काही तर उघडपणे संविधान बदलणे, जाळणे आणि मनुस्मृती लागू करणे ह्याचा आग्रह खुलेआम आणि छुप्या रीतीने पण करतात.

हे कोण आहेत हे तुम्हाला चांगलं ठाऊक आहे अशी मि अपेक्षा करतो.
ह्या विचारांना आणि त्याचं समर्थन करणाऱ्या लोकांना बळ मिळू न देने हिच सर्वात पहिली गरज आहे संविधान रक्षणाची.

आता हळु हळु देशात निवडणुकीचे वारे वाहू लागतील, डोळे आणि कान उघडे ठेऊन लक्ष राहू द्या की कोण संविधानाची साथ ठेऊन बोलतंय.
कोण फक्त जुन्या रूढी परंपरा, पोकळ देशप्रेम, राष्ट्रवाद, पुतळे, प्रतिके, नामांतर, धर्मरक्षण ह्याच गाणं गातय
आणि
कोण सर्वशिक्षण, मूलभूत आरोग्य सुविधा, शेतकरी आणि त्यांचे खरे प्रश्न सोडवणे, रोजगाराच्या समस्या सोडवणे, धार्मिक सलोखा आणि शांतता ह्या पायावर राबवलेला सामाजिक आणि आर्थिक विकास साधण्याचा ध्यास दाखवतंय.

अश्या प्रकारचं समाजकारणातून राजकारण करणाऱ्या लोकांना बळ देणं ही सुद्धा संविधान रक्षणासाठी महत्वाचं योगदान होईल.

अजूनही बरंच काही करता येऊ शकेल, स्वतःला संविधानाप्रति थोडं जागरूक करा, समजलेलं इतरांना समजवून देण्याचा प्रयत्न करा आणि काहीच नाही जमलं तर इतरांना सर्वप्रथम मानवतेच्या नजेरतून बघणं कधीच सोडू नका, बाकी जात धर्म प्रांत देश हे सगळं नंतर ठेवा. बरंच काही लिहिता येईल, बऱ्याच लोकांनी लिहिलं सुध्दा आहे तेव्हा तूर्तास मि इथेच थांबतो.

पटलं तर अभिप्राय कळवा.